Friday, December 31, 2010

पुन्हा निरक्षर...

पुन्हा निरक्षर होता आलं असतं
तर बरं झालं असतं...

मुळाक्षरांच्या बुबुळात बुबुळे घालून
संवेदना हरवून गेल्यात जगण्याच्या...
डोळ्यांना दिसते आहे म्हणून फ़क्त...?
मेंदूचं काम थंडच... कित्येक दिवस.

वृत्तपत्रे अन माध्यमांच्या
आवाजाला म्हणतो आहे
माझा आवाज...माझं ज्ञान

या मुळाक्षरांनी दाखवली खरी
डोंगरापलीकडची घळ.
पण ओळी ओळीतून
मला बसवलच
काचेच्या घरात...


वाचून वाचून डोळे आगावले
नि लिहून लिहून बोटे निर्जिव...
पण ना टाळी लागली कुठे...
ना दंगलीत फेकला गेलो आपोआप...
घृणेची थूंकी टाकत राहिलो
आपली कमी पडू नये म्हणून.


आता बाहेर पडलो तरी
असेलंच सोबत

या अक्षरांची सावली त्यांचे डाग...
व्यक्त होण्याच्या निलाजस सवयी


खरच पुन्हा निरक्षर होता आलं असतं तर...?

Friday, December 17, 2010

तिला वाटले...




ही कविता संगितबद्ध केली असून त्याची यू ट्यूब वरील लिंक जोडतो आहे.


तिला वाटले तिच बरोबर...
मला वाटले चुकलो मीच...
......................
......................

एक कुणीशी होती माझी
माझ्याहूनही माझी माझी
नव्हते काही वेगवेगळे
वाट एक ती तिची नी माझी

शपथा होत्या उधाणलेल्या
स्वप्ने होती अंकुरलेली
मन्मनातील फुले बावरी
अलगद होती सावरलेली

सरल्या वाटा अवखळ-अनघट
सरली वळणे अवघडशी
काळ जरासा पोक्त जाहला
नवलाई अन अवजडशी

तशी अचानक उल्केपरी त्या
म्हंटली होती मजला ती
"प्रेम नि माया झूठच सारे
फसवी सारी ही नाती"

"पाण्यासम त्या व्हावे जगणे
वा-यासम त्या गावे गाणे "
आणि म्हणाली, "किती बंध हे
रोज तेच ते येणे-जाणे"

क्षणभर थरथर पडते अंतर
दूर उभा मी बघताना...
प्रेमामधले शब्द तिचे ते
जखमेपरी त्या जपताना...

हाय! "सखे तू असो सलामत"
दुवा देत ही जगतो आहे...
तसाच वारा तसेच पाणी
रोज नव्याने बघतो आहे...

तिला वाटले तिच बरोबर...
मला वाटले चूकलो मीच
उमगून येता गत फसवी ही
माझ्यावरती हसलो मीच...
kamalesh kulakarni

Tuesday, December 07, 2010

प्रपोज

प्रपोज १
"तु मला मित्र म्हणून आवडतोस पण...
मी तुझा त्या दृष्टीनं
कधीच विचार केला नाहीये.
प्लिज राग मानू नकोस "

प्रपोज २
"तुला वाटतं तितकं सोपं नाहीये माझं.
अजून तू माझ्या ताईला आणि बाबांना
ओळखत नाहीस."

प्रपोज ३
"तु चांगला आहेस रे ... पण
माझ्या बाबांनी खूप कष्टात दिवस काढलेत
आता त्यांना आम्हाला सुखी पहायचय...
मी त्यांच्या अगेंस्ट नाही जाऊ शकत."

प्रपोज ४
"थांब. आत्ता नको.
घरात माझ्या लग्नाचा विचार चालू झाला की
मी दुसरं कुठलाही स्थळ बघण्यापूर्वी
तुझंच नाव सुचविन. इतकं नक्की."

प्रपोज ५
"व्वा... आहे का आठवण?
म्हणे लग्न करायचय.
माझी किंमतच नाही तुला.
सारखं काय काम काम काम?
इतका पैसा पैसा केलेलं
मला नाही आवडणार बुवा.

प्रपोज ६
ए एक विचारू ?
- मी का आवडते रे तुला?
- माझ्यासारखीच यापूर्वी कुणी? "

प्रपोज ७
"खोटं खोटं खोटं
सगळ्यांसारखेच आहेत
माझे डोळे माझे केस माझे ओठ
एक सांगू? तू नवरा म्हणून
छान वाटतोस मला."

प्रपोज ८
"ए इतके नॉन-व्हेज मेसेजेस
नको पाठवूस न...
चूकुन बाबांच्या हातात
मोबाईल पडला तर...?"

प्रपोज ९
मला खूप भीती वाटततेय रे ...
नुसत्या एका किसवर थांबणारे का?
पण भेटायचं कुठे?
आणि हो एकच किस हं? प्रॉमिस?

प्रपोज १०
"नको... थांब... प्लिज...बास...
खुप पुढे जाऊ नकोस
भीती वाटतेय...
आई-बाबांना फ़सवतेय असं वाटतय.
ऊं. थॅंक्स. छान वाटतय..."

प्रपोज ११
"आता जरा जपूनच रहावं लागेल.
बाबांना शंका होतीच.
तुझ्याशी काँटॅक्ट तोडायला सांगितलाय.
तुझ्याविषयी सगळी चौकशी केली त्यांनी.
खुप अवघड झाल्यात गोष्टी...
- तु सेटल हो लवकर...
घर, गाडी. म्हंजे मला नीट बोलता येईल."

प्रपोज १२
"आज घरी एकटीच आहे.
लग्नाला गेलेत सगळे.
येना लवकर."

प्रपोज १३
"बाबांनी एक स्थळ आणलय.
मुलगा युएस चा आहे."

प्रपोज १४
"मी तुला गुंतवलं?
मी पहील्यापासूनच क्लियर होते
बाबा आणि ताईच्या अगेंस्ट जाणार नाही म्हणून.
माझ्या जागी दुसरी कुणी असती तर ...
विचार तरी केला असता का तुझा?"

प्रपोज १५
"खुप छान वाटतं रे तुझ्या कुशीत
असं वाटतं अशीच रहावी ही मिठी.
पण आपण हे थांबवायला हवं...
उद्या माझ्या होणा-या नव-याला
मी कसं सामोरं जाऊ?
सांगते ते ऐक न प्लिज
तू पण लग्न कर...
मिळेल तुला माझ्याहून छान बायको
मी शोधू का?"

Saturday, November 27, 2010

आता भेटलो तर....

आपल्याला माहीत होतच
पहिल्यापासून की शक्यतो
आपलं लग्न होणं
अवघड आहे ...

पण तरी आपण
जगाची नजर चूकवून
भेटत राहीलो
जणू की आपल्य़ाला
हेही माहीत होतं की शक्यतो
लग्न वेगळं अन हे वेगळं ...

मिळालेल्या संधीचे नि काळाचे
आपण धनी झालो
पण जाता जाता
एकमेकांच्या मनावर
वळ उमटवत गेलो ...

आपल्याला माहीत असल्यासारखे
की अशा
जखमा केल्याशिवाय
पुरतं दूर होणं
शक्यच नव्हतं म्हणून...

आज याच शहरात
वावरतो आहोत
आपण दोघे...

दोघांच्याही मनात
रोजरोज तिच आंदोलन...
एकमेकांविषयीची...


पण आता दोघांच्याही
मनाचे मालक
वेगवेगळे

योगयोगानं रस्त्यात
दिसतोही आपण
एकमेकांना
पण दोघेही
टाळून जातो
एकमेकांची नजर...
मनाची वळणे ...

दोघांनाही पक्क
ठाऊक असल्यागत की
आता भेटलो तर....

Wednesday, November 10, 2010

पाऊस

पुन्हा एकदा मनात माझ्या आला पाऊस
तुझी आठवण गुदमरली अन झाला पाऊस


क्षितीज कुठेसे हरवून बसले आहे माझे
डोळ्यांमध्ये उगाच ना सापडला पाऊस



खुप मारल्या हाका पण तू वळली नाहीस
भर पावसातूनी निघोनी गेला पाउस


मला एकटा पाहून त्याने कहर केला
तिच्या घराच्या आत अचानक शिरला पाऊस


एक बरे की ढगा तुला ही खिडकी आहे
विरहाच्या बेरंग क्षणांतून रंगला पाऊस


 
कमलेश

Monday, November 08, 2010

प्रेम

तिच्या कॉस्मॅटिक अदांवर
मी करत राहिलो
आयुर्वेदिक प्रेम

मला जाणवायचं
तिचं प्लॅस्टिक स्माईल
पण साला माझा रागही
इकोफ्रेंडली

कॅटबरी, केक्स, गिफ्ट्स मधून ती
जपू पहायची नाँनस्टीक नातं

आणि तरीही मी
राखायचो निगा
तिनं दिलेल्या एकेक
जखमेची- अश्रुंची
रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी....

: कमलेश

Saturday, October 30, 2010

अपूर्ण

खरं तर मला
काहीच म्हणायचं नव्हतं कधीच...
पण म्हणून बसलो.
जसं की तिला
प्रपोज करून बसलो...


मग देत राहिलो उगाचंच
समर्थने स्व-कृत्याची.
जसं की देत राहिलो
ती का आवडते वगैरेची...


मला जे म्हणायचय
ते कितीतरी लोक

म्हणून बसलेत आँलरेडी.
खर तर मी त्यांचेच शब्द चोरून बोलतोय
स्वतःचे असल्याच्या थाटात.
ऎकणारे ऎकतात...
जसं की ती ऎकते...


मग मी खरा की खोटा?
शोध शोध शोधूनही
सापडत नाही मलाच.
उत्तर अपूर्णच याही प्रश्नाचं
जसे की तिचे डोळे...
दाद लागू न देणारे...
अपूर्ण...
आणि म्हणूनच मला ते
माझे अगदी माझे वाटणारे...

-कमलेश कुलकर्णी

Saturday, October 23, 2010

मुंगळे

सगळेच हात हालवत निघलो शहराकडं
बापाचं गठूडं असल्यागत


पटापट चिकटलो गुळाला
मुंगळ्यांचा धर्म पाळीत
ढेपा बदलत राहील्या
पण आम्ही मुंगळेच
रांगेतल्य़ा शिस्तीतले


कुणास ठाऊक ही ढेप
गावच्या मातीतल्या ऊसाची
तर नसेल?


आणि ते खरोखरीचे मुंगळे
ते तर आपल्या बिळांत
आन्नाचा खुप साठा
करून ठेवतात म्हणे
च्यायला आपल्याला

तेही जमलं नाही।

आता गावात परतायचं म्हंटलं तरी
हात हालवतचं जावं लागेल.
गठूडं संपल्यागत


त्यापेक्षा इथेच राहू
मुंगळे बनून
रांगेतल्या शिस्तीतले.

Friday, October 15, 2010

लँमिनेट

"आपण ब्राम्हण आपण ब्राम्हण"
असं समजावत
सगळी कातडी
लँमिनेट
करून टाकली
मोठं होईपर्यंत घरातून

बाहेरच्या बाहेर धुता येतील
इतकेच शिंतोडे
उडायला हवेत स्वत:वर
दटावून सांगत राहीले संस्कार

"आपण कसे श्रेष्ठ
आपण कसे उच्च "
अशी वाक्ये
दबक्या आवाजातच
पोहोचली कानात
अन आंबेडकर - फ़ुल्यांवरची भाषणं
ताठ मानेनं चढ्या आवाजात
सांगत
छाती फ़ुगवून घेतली
शाळाभर ...

शेजारच्या मुलाच्या
अंगाचा वासही
वाटायचा जातीय
पण त्याचा पीळदार स्नायू
कुठल्या जातीत राहून तयार झालाय
हे सांगितलं नाही कुणीच

ताटात हात धुतल्यावर
कानशिलात खायचो वडलांची
म्हणायचे, " याद राख पुन्हा
असा अन्नाचा अपमान करशिल तर..."
पण
"चिकन मटण खाणा~या
मुलांच्या बैठकीत बसायचं नाही
खायला शाळेत "
बजावून पाठवायचे
जणू की ते अन्नच नाही।

आता कुणाच्याही
खांद्याला खांदा लावून
काम करतो झकत

पण कातडीवरच्या
या लँमिनेशनपाई
कष्टाच्या घामाचा
अन शरीराचा
खराखुरा वासही
येईनासा झालाय.

Friday, May 28, 2010

तू कुठे ?

मी कुठे आणि आता तू कुठे ?
राहीले न आपले ऋतू कुठे


जरी नवेच शब्द रोज सोबती
परी मनास मी रीता करू कुठे ?


आरशास रोज रोज सांगतो
आरजू कुठे आता आबरू कुठे


कुठे कुठे तुझी नभे तुझ्या दिशा
एकट्यासवे आता फ़िरू कुठे ?


आँख आज अश्कसे भरी हूई
जीतेजी मौत है सजू कुठे ?


: कमलेश कुलकर्णी

तोडगा

असं वाटतं
तिचा खुन करावा किंवा
मोक्याच्या क्षणी आत्महत्या करावी.
त्या शिवाय कठीण आहे ही आसक्ती जाणं...


वाटतं ...
तोडून-मोडून टाकावं सगळं जग
भुकंप व्हावा जोरदार
माणूस नि माणूस मरून जावा इथला
उरो ती आणि मी फ़क्त...


पण बायकोच्या
प्रेमळ, आसुसलेल्या डोळ्यांकडं पाहून
घ्रूणा येते माझी मलाच.
वाटतं बायकोलाच सुखी ठेवावं
क्षण न क्षण
तिच्या जागी हिला पहावं
आणि त्यातूनच देत रहावी दुवां
ती सुखात राहण्याची ...
अन तिनेही करावं असंच.
ओलांडत जावेत खाचखळगे
दुवां घेता घेता ...
कुठल्याही भेटीविना ... शब्दाविना ...


: कमलेश कुलकर्णी

Tuesday, May 25, 2010

तसे खुपदा

तसे खुपदा सावरले मी
मनास माझ्या आवरले मी


कुठे तिच धुन ऎकू येता
पुन्हा एकदा बावरले मी


आता एक सल शांत जाहली
जरी कितीदा गहिवरले मी


अशी प्रित ना व्हावी कोठे
मिटूनी वाटे डवरले मी


:कमलेश कुलकर्णी

खरखर

तिचं आणि माझं
नातं म्हणजे
रेडिओवरचं स्टेशन झालय...


जिथून पुढे सरकलो की
तिची खरखर आणि
मागे सरकलो की
माझी....

काहीतरी

इतुके बोलुन होते तरीही
राहून जाते काहीतरी
पुन्हा भेटशील तेव्हा सांगेन
तुला नव्याने काहीतरी


डोळ्यांमधले अर्थच म्हणती
निशब्दांच्या डोळ्यांना
मलाही थोडे राहू द्या ना
सांगायाला काहीतरी


विश्चासाच्या धुक्यात सरल्या
अवघ्या वाटा कुजनाच्या
मधूनच थोडे मौन पाळले
अर्थासाठी काहीतरी


सांगत होतो ओठांनाही
असते भाषा मधूर अशी
तव ओठांनी तू म्हंटली होती
"तुझे आपले काहीतरी"


झाले बोलून गेलो बोलून
आत आतले गुपीत असे
तुलाच ठाऊक आहे सारे
इतुकेच गुपीत मग काहीतरी


: कमलेश कुलकर्णी

सल

आपल्याला आजही
अक्षम्य वाटतात त्यांच्या
’न’ आणि ’ण’ च्या उच्चारातील
व्याकरणात्मक चूका...

ते आयुष्यभर मागत राहीले
"पानी पानी" हक्काचं
शेवटी त्यांनी आपल्या
रक्ताचंच पाणी केलं
आणि जे व्हायला हवं होतं
तेच झालं .

पण आपण आजही
सोडत आहोत
आपल्या प्रव्रूत्तींचे
टोकदार बाण
त्याच लक्षावर
व्याकरण चालवून...

ते घायाळ होऊन
पानीच मागताहेत हक्काचं
आणि त्यांच्या
उच्चारातला ’न’
आप्ल्याला फ़ार
खोलवर सलतो आहे

: कमलेश कुलकर्णी

ती दिसतेच

ती दिसतेच मजला या डोळ्यांत मिटल्या
छटा या तिच्या कशाच्या नि कुठल्या
कधी हासते या धुक्यांतून सा-या
कधी गुंफ़िते श्वास वा-यात सुटल्या

असा मत्त वारा तिचा श्वास होतो
मनाला कुठेही तिचा भास होतो
तिला काय होते न ठावे जराही
मी माझ्याच स्वप्नी तिचा ध्यास होतो

मी काही तरी सांगू पाहतोच तिजला
तसे शब्द वेडे हसतात मजला
ती असते पुढे त्याच साधेपणाने
मी होतो तसा फ़ार भाऊक भिजला

असे वाटते तिच साथी असावी
तिच्यासाठीची एक कविता असावी
अशा दूरच्या या प्रवासात सा-या
ती बाहूंत माझ्या रडावी हसावी


: कमलेश कुलकर्णी

स्वगत


टाचा उंचाऊन कधी पाहीलच नाही
दिसू शकले असते असे
नजरेतील काही टप्पे...
की भरू दिल्या नाहीत जखमा
सहानुभूतीच्या दयावान नजरेसाठी...

कुणाच्याही ढुगणावर लाथ
मारली नाही बिष्यांत;
तसं कुणाला जवळही केलं नाही पार

आकाशाचं कौतुक ऎकणारं कुणीतरी होतं
तोवरच सुचत राहील्या आकाशावर कविता
उद्या वा-याचं कौतुक ऎकणारं भेटेलच की कुणीतरी
तेव्हा वा-यावरही होईलच लिहून ...

ते सगळे वाटत राहीले जवळचे
ज्यांना गरज होती माझी
कुणीतरी आपलसं म्हणतय या समाधानाखातर

उपक्रम सुरू केले दिमाखात
नंतर बंदही केले गुपचूप
करीत राहीलो स्वत:ची समर्थने
दुसरा अटळपणे
मान्या करीत नाही तोवर ...

कधीही केला नाही खुलासा
स्वत:जवळ;
स्वत:कसूनच झालेल्या चूकांचा.
तिरस्कारांचे जंतू फ़िरत राहीले रक्तात
अन प्रगल्भ होत गेली
एकलेपणाची जाणीव
दुस-याच्या तीळभर यशाने।

पोरीही आवडल्या
त्यांच्या सवडीनं;
फ़ुलांचे निर्माल्य होत राहीले नियमीत
दिवसेंदिवस दगडाचंच होत गेलं
मन, ह्र्दय ...
"पुन्हा प्रेम करणे नाही .
असचं वाटत राहीलं दरवेळी..."

हसलो नाही मनमुराद
की फ़सलो नाही
घुसलो नाही कुठे खोलवर की
बसलो नाही

उपकारांपासून दूर ठेवला माथा
वा-याशी फ़िरू दिले नाहीत श्वास
झोपेत चूकूनही पडलं नाही
एखाद्या बक्कळ श्रीमंताचं स्वप्नं
गर्भपात करून टाकले वेळीच अशा
भलत्या-सलत्या स्वाप्नांचे
की ज्यांना जन्मभर पोसणं
परवणारं नव्हतं कधीच

गर्दीत फ़िरत राहीलो बेवारस
एकांतात मालक झालो जगाचा
अंधारात चाचपडत राहीलो प्रकाश
उजेडात दिव्याकडं पाहयचं
विसरून गेलो

पण ओसंडून बोललो आजवर
फ़ुगीर आधिकारानं
केलं तसं काहीच नाही
लिहीलही बरच काही उत्साहात
शेवटी फ़िकीच पडली शाई

स्वत:च्या आत शिरलो नाही कधी
की बाहेरही पडलो नाही
मनाच्या खुंटीला जन्मभर टांगून ठेवलं
स्वत:चंच जिवंत प्रेत

आत्महत्या कराविशी वाटली खरी एकदा
नंतर वाटलं ...
"मरू देत; नाहीतरी मेल्यावर
दखल कोण घेणारेय आपली..."

: कमलेश कुलकर्णी

दुष्काळ

तू त्या काठी
अन मी या ...


मधे सो काँल्ड
परंपरेची नदी तशीच
दुथडी भरून वाहताना ...


आपण कुठल्याशा
फ़ुटकळ आशेवर
एक होण्याचं
स्वप्नं बघतो... वाटं बघतो ...


मग स्व कष्टानं पुल बांधतो.
अन एकत्र येतो ;
तोच नदीत दुष्काळ पडतो।


:कमलेश कुलकर्णी

शहर

उकरून काढावसं वाटतं
सगळं शहर
आणि पहाविशी वाटतात
गुदमरलेल्या श्वासांची प्रेते ...

या शहराचा हिस्सा म्हणून स्वत:ला
आंतर्बाह्य कबूल करवूनही
मी याच शहराविरूद्ध बंड
का करू पाहतोय
कळत नाही.

हे बंड नसेलही
नाहीच मुळी;
कदाचित माझ्या आत्यावस्थ श्वासांना
त्याच्या मरणाची
चाहूल लागली असावी...

मला तयार रहायला हवं ...
गुदमरलेल्या श्वासांच्या प्रेतात
माझ्याही श्वासांचे प्रेत
सोडून द्यायला....

शहरं उभी करायला अशा श्वासांचे
बळी द्यावेच लागतात ।

:कमलेश कुलकर्णी

कोंब

मी माझ्यापासून पळतो आहे लांब
अन म्हणतो आहे मलाच वेड्या थांब


ही पराभवाची गर्दी जमली भवती
अन अपमानांचे घाव उराशी सलती


आतून उधळती अहंकरी घोडे
पावलास एका एक नव्याने कोडे


ऎकीतो माझी मी कौतुके असेना खोटी
घोटतो गळा मी सत्य असे ज्या ओठी


त्या सत्य असत्या पासून आहे दूर
ही वणवण चालू उरातूनी काहूर


द्याविशी वाटते तनामनाला भूल
ती नको नकोशी जगताची चाहूल


मी मलाच हा सामोरा कैसा जाऊ
रूप विद्रूपाचे कसे कळेना साहू


मी चंचल, उदास, उजाड झालो आहे
मी असह्य होऊन मलाच भ्यालो आहे


चाललो दूर मी माझ्यापासून लांब
मी मला भेटता उगवेन फ़िरोनी कोंब


: कमलेश कुलकर्णी

Monday, May 24, 2010

मला जगायचय

सुरकुती देखिल हलणार नाही
किंवा माशी उठणंच काय पण
बसणही पसंत करणार नाही अशा
सुतकी चेह-यानं दाखल झालो
या शहरात...


कितीही असह्य असले तरीही
अपरीहार्य असणा-या इथल्या रस्त्यांवर
थोडंस दबकत थोडसं थबकत
काळजीपूर्वक सगळं न्याहाळून
निश्चित करून टाकलं एकदाचं
स्वत:च्याच राहत्या घराचं
या शहरातलं स्थान ।


पैसा , हिशेब , व्यवहार , स्वार्थ
या मूलभुत गरजांशी जुळवून घेताना
त्रास झाला खरा या शहरात.
प्रेम , माणूसकी , आपुलकी , त्याग , निष्ठा
इत्यांदिंची वळकटी करून काखेत कोंबताना
त्रास झाला खरा या शहरात।


पण आता?
आता अवघं आयुष्यं
सुरळीत चालू आहे.
पैशाने विकत मिळणा-या
त्या तमाम उपभोग्य वस्तूंचे आभार....
आता एकटं असूनही
एकटं असल्यासारखं वाटत नाही या शहरात...
अन वाटलच जरासं एकटेपण
तरी त्रास होत नाही.
कारण इथे सगळेच एकटे...


अन्याय, आत्याचार, जूलूम, पिळवणूक, फ़सवणूक
या सा-यांवर मी कधी कधी
चिडतो, संतापतो, तडफ़डतो, तळमळ्तो
पण सारंकाही हिशेबात सारंकाही हिशेबानच।


कधी कधी अभिमानानं उरही
भरून येतो माझा की
आपल्यासारख्याच निर्वासित बांधवांच्या तुलनेत
किती पुढे आलो आहोत आपण
आपण इथले की तिथले असा प्रश्नही
पडत नाही आता स्वत:ला.
पण कसं सांगू त्या
निरश्रीत अजाण बांधवांना की
या शहरात जगायच असेल तर
भिका-याच्या थाळीतून एखादा
भाकरीचा तुकडा किंवा
देवळाच्या दारातून नवी कोरी चप्पल
चोरून आणायची क्षुल्लक सवय देखिल
तुमचे आयुष्य रुळावर आणू शकते।


असो शेवटी ज्याचं नशिब आणि तो...

आता अभिनयाच्या अंगानं का असेना
पण माझा चेहरा हसरा असतो.
हेवा वाटावा असा आनंद ओसंडत असतो
माझ्या चेह-यावरून
अवघ्या विश्वाची कळकळ असावी
इतकी करूणाही भरून ठेवता येते
मला माझ्या डोळ्यांत सोईनुसार...


आणखी एक महत्वाचं
या माझ्या झालेल्या शहरीकरणाचा
मी जराही त्रास करून घेत नाही
कारण ...
असं का होईना तसं का होईना
मला जगायचय ... मला जगायचय ...

:कमलेश

Friday, May 21, 2010

कविता

तो पाऊस असतो ढगांची कविता
ऋतू गार हिरवा सरींची कविता
थवे पाखरांचे तरूंची कविता
इथे रोमरोमी कविता कविता

कसे अर्थ यांचे कशी संहिता ही
शब्दांप्रमाणे परी शब्द नाही
अर्थास कुठल्या कुणा भार नाही
कुणा गर्व नाही बाजार नाही

अशी का कविता मला ना स्फ़ुरावी
झरावी झरावी तरीही उरावी
असा का न अर्थ मलाही कळावा
जयांतून काही मला अर्थ यावा।

: कमलेश

आकाश


हे माझ्या प्रिय बांधवांनो ...

तशा आमच्या दारांना अद्याप
आतून ब-याच कड्या शिल्लक आहेत तुमच्यासाठी...

म्हणुनच मी नाकारतोय
माझ्याच घराच दार
आणि बसतो कडी तुटलेल्या खिडकीपाशी ।

मला सापडत जातात
तुमच्याच कुठल्याश्या पुस्तकातून
आमच्याच जात बांधवांनी केलेली
पाशवी क्रूत्ये
मंदिराला कुलूप ठोकून
गाभा-यापर्यंत पोहचायला
तुंम्हाला केलेला मज्जाव

तुमचा उद्वेग , तुमचा लढा ,
आणि तुमचे विद्रोही निशाण
आकाशाच्या रंगाचे...

मला अभिमान वाटतो तुमचा।

पण तरी मी झुगारतो
तुमच्याही निशाणीच अस्तित्व
माझ्या निशाणीसारखं...
आणि कड्या असलेल्या दारांसारखं...

तुंम्ही लढायचं थांबा आता.
आणि नाकारत - झुगारत चला
आमचं अस्तित्व.
(आंम्ही नाकारतो तसं)
स्वत:चा शक्तिपात रोखण्यासाठी।

जिथं तुमचा-आमचा हा भेदच गौण आहे
तिथं लढून काय मिळणारेय
आपल्याला?

उद्या पुन्हा होऊ शकतो
गाभार्यापर्यंतचा प्रवेश बंद तुंम्हाला
तेव्हा स्वत:चा गाभारा मांडा दाराशिवाय
पण जेव्हा आंम्ही करू तुमचे
पाणवठे बंद
तेव्हा पाणि निशिद्ध माना स्वत:हून
आणि फ़क्त रक्त प्या
आमचं-माझं
तेवढं धारीष्ट्यं दाखवा ऎनवेळी ... प्लिज...

खुप घूसमट होतेय या
जाड भिंती अन दारं , खिडक्याच्या घरात।

कुणी मांडून ठेवलाय
हा रंगाचा खेळ माहीत नाही
आणि आपण येवढे का
गुंतलो आहोत या खेळात
ठाऊक नाही

आपण फ़क्त आकाश
आपले मानुयात
ज्याचे तुकडे करणं
अजून तरी शक्य नाही.
:कमलेश

ठणक

दिवसभराचा थकलेपणा गोळा करत
एक ठणक जमा होतो
कुठेतरी शरीरात ...
निवांत रात्री पाठ टेकवताना
ठणक वेधून घेतो माझं लक्ष।


पूर्वीचे लोक किती कष्ट उपसायचे
तरी टवटवीत असायचे.
आपण उगाचच लाड पुरवतो शरीराचे
असा विचार करत
मी दुर्लक्ष करतो माझ्या ठणकेकडे .
किंवा उपाय म्हणून एखादी काँम्बीफ़्लेम घेतो।


कुशीवर वळताना जाणवत राहतं
पोट वाढल्याचं...
उद्यापासून नक्की व्यायाम करायचाय
असा दिलासा देत स्वत:ला
झोपी जातो आपोआप।


सकाळी उठल्यावर
पोट साफ़ होत नसतं हवतस...
काय खाऊ काय नकोच्या कन्फ़ूजनमधेच
मी पोटात ढकलतो
दोन प्लेट नाष्ता.
आणि पुन्हा सामिल होतो
दिवसभराच्या धामधूमीत।


मी जीवावर आल्यासारखी
करत राहतो कामे दिवसभर
दिवस जातो कसाबसा ...


पण पुन्हा नवा ठणक
जमा झालेला असतो
पोटाचा आकार अजून मोठा दिसतो
झोपी जाता जाता...


एखाद्या रात्री मधेच जाग येते
घामाघूम होऊन
जळजळत्या छातीवर हात ठेऊन मी
सुन्नपणे बसतो...
मला स्वप्नं पडालेलं असतं
मी मेल्याचं ....
मी थोडावेळ विचार करतो
माझ्या मरणाचा...
मग घड्याळ बघतो
रात्र खुप झालीय म्हणुन
पुन्हा झोपी जातो गाढ।


माझ्या मरणाकडे दुर्लक्ष करीत.....


: कमलेश

मी

उन्ह उन्ह म्हणते ’मी’
पाऊस पाऊस म्हणातो ’मी’
मी मी म्हणत कोणी
माझ्या आत कण्हतो मी


नदी म्हणते ’चला चला’
वारा म्हणतो ’फ़िरा फ़िरा’
नदी - वा-याचे ऎकून रोज
उगाच हा फ़रफ़टतो मी


आई म्हणते बट्ट्याबोळ
बाप म्हणतो घाला घोळ
डोक्यावरती ओळ घेऊन
गल्लीबोळ फ़िरतो मी


रोज पोटस लागते भूक
रोज जीवास लागते सुख
रोज नशिब धरते डूग
तरी उभारी धरतो मी


तिच्या पोटी माझे बाळ
माझ्या हाती त्याचा टाळ
आज काल देव जाणे
कुठला काळ जगतो मी


: कमलेश

Wednesday, May 19, 2010

इन्द्रिय

शहर कधीच दया करीत नाही
रेड लाईट एरीयावर ...

शहर गर्दीतून मिळवते प्रायव्हसी
शहर एकट्याचं, दोघांचं किंवा सगळ्यांच
असं नसतंच मुळी.
गर्दीत एक शरीर दुसर्या शरीराला
हेतूपुर्वक घासतं...
आक्षेप असेल तरी दूस-या शरीराच्या मदतीला
धाऊन येतात बाकी शरीरे
आया-बहीणींचा जल्लोश करीत ...

वयात आल्याआल्या
शहराला मिळू शकतो
सेक्स पर्टनर .

तरी शहराची लाळ टपकत राहते
फ़ाईव्ह स्टार , थ्री स्टार ,
निसर्गरम्य रेस्ट्रोरंट्स मधून
लोजच्या रुम्स मधून ...


शरीरा बरोबर टिपून घ्यावासा वाटतो
प्रणयकाळ धाडसाच्या पुरुषी केमे-यात
आग पेटत जावी वणव्यात
त्या वेगात स्प्रेड होत जातात खाजगी क्लिप्स
सामुहीक बनत...

शहरभर पसरलेल्या दिसतात पताका
मर्दाना जोश आणि
कमजोरीके इलाजच्या जाहीरातींच्या...
तरी शहराला विश्वास असतो...
स्वतःच्या स्टेमिन्यावर ...
अगदीच गंमत म्हणून
शहर ट्राय करू शकते
एखादे सप्लिमेंटरी ...

मोबाईल्स , इंटनेट, टीव्ही, सीडीजच्या केन्व्हासवर देखिल
शहर पाहू इच्छिते
वस्त्रहीन सोहळे...

या व्यापात शहराला
पत्ताच नसतो...
दिवस उजाडण्याचा वा मावळण्याचा...

शहर भरून येतं एकाएकी
आणि शहर थकतंही एकाएकी

लहानग्यांपासून प्रेतांपर्यंत सर्वांना
एकच इंद्रीय असल्यागत
शहर वागत असतं रोज.




: कमलेश


Tuesday, May 18, 2010

अन्नास्थेशिया

कलिंगडवाल्याने कितीही कलिंगडे विकली
तरी त्याचा एकही गड
बांधून होणार आयुष्यात...


मोलकरणीने कितीही भांडी चमकवली
तरी तिचं नशिब उजळणार नाही कधीच।


गवंड्याने जन्मभर झिजून बांधली
लाख घरे तरी तो
उपराच राहणार इथे


भूतकाळ आणि भविष्याच्या अँनास्थेशियात
वर्तमानाचा ठणक कधीच जाणवत नाही इथे...


आपण फ़क्त बातम्या वाचतो...
चोरीच्या, दरोड्याच्या , फ़सवणूकीच्या.
आणि त्यावर चर्चा करतो...


: कमलेश

प्रेम


किती वेळा किती जणींच्या
प्रेमात पडलो मी...
आणि तरीही
" प्रेम एकदाच होतं आयुष्यात "
हे वाक्यही वाटायचं खरं
त्या त्या प्रेमात ...

नववीच्या वर्गात असतना
झाला होता चुकून नकळत
एका मुलीच्या गार हातांचा स्पर्श
रोमांच उठले रानभर
त्या रात्री पडलं होतं
तिचच मोठ्ठ स्वप्नं
जाग आली झोपेतून-स्वप्नातून मध्यारात्री ...
पण तरी जागेपणी
करून टाकलं होतं ते स्वप्नं पूर्ण
पुढे काही दिवस रचत राहीलो
तिचीच स्पप्नं वाट्टेल तशी...

तेव्हा या प्रेमाला ’प्रेम’ हे नाव द्यायचं
ध्यानातच आलं नाही ...

पुढे कॉलेजात आल्यावर
कसं कुणास ठाऊक
एक मुलगी माझ्याकडं - मी तिच्याकडं
डोळ्यात डोळे घालून पाहू लागलो
न ठरवूनही सगळं काही ठरल्याप्रमाणे...
कधी यायचं, कुठे बसायचं,
कुठला बेंच
ती जवळून गेली तरी
श्वास थांबायचा आपसूक
वाटायचं तिचे बोलके डोळे
सारं काही सांगताहेत मला
मग खूप विचार करायचो
ठरवायचो की ...
तिला जाऊन विचारावेत
तिच्या डोळ्यांचे अर्थ.
पण धाडस झालं नाही कधीच
ना तिच ना माझं
नंतर न ठरवूनही ठरल्यासारखं
’या जन्मात भेट होणे नाही’
हेही मान्य केलं आम्ही.
पण डोळे मिसळतच राहीले डोळ्यांत
एकमेकांना दिसेनासे होईस्तोवर।

वाटलं हेच प्रेम। शब्दातीत.

पुढचा मामला औरच
पोरगी दिसली , आवडली ,
डाव रचले , इंप्रेस केलं ,
प्रपोज केलं, पटवली ।

भरपूर भेटलो , प्रचंड बोललो ,
शेअरींग केलं , एक्सप्रेस झालो ,
ओकलो।

प्रायव्हसी मिळवली, हातात हात घेतले,
जवळ बसलो, स्पर्श केले
एकरूप झालो।

मग शपथा घेतल्या
कधी दूर न जाण्याच्या
एकमेकांसाठी जीव देण्याच्या।

नंतर लग्न झालं...
तिचं कुणाशी माझं कुणाशी
पण ना तिने जीव दिला
ना मी जीव दिला.
अन आता किती हूशारीनं चाललो आहोत
एकमेकांचे रस्ते टाळत...

आता बायकोशी मी किंवा
बायको माझ्याशी
नाही लावत बसत
प्रेमाचे अर्थ - तर्क किंवा काही
एकमेकांचे बंधन झाल्यासारखं
वाटतं दोघांनाही
पण जीव थंड झाल्यासारखंही वाटतय...

यापैकी कशालाच आता
प्रेम म्हणवत नाही.
पण जे झालं ते
अगदीच निरर्थक होतं
असही म्हणवत नाही।
: कमलेश

जखमी


उमगत नाही इतका का मी मलाच जपतो
जपतो तरीही असा कसा मी जखमी होतो

पुसता माझ्या मी या जन्माचे कारण
आयुष्याला माझा तेव्हा विटाळ होतो

किती किती हे भाव पेरले चेह-यावरती
भावाहूनही भाव तरी चेह-याला मिळतो

रात्रीतूनही या धरतीवर प्रकाश आहे
अंधार आता बस फ़क्त आपल्या मनात होतो

तीळ कसा बघ अश्या नेमक्या गाली तुझिया
जीव बिचारा त्याच्यावरती तीळ तीळ तुटतो

वयात आलो आम्ही दोघे एकावेळी
बाकी आता एकावेळी काही ना करतो

नाळ मिळाली हातामध्ये या जन्माची
हवा तसा जन्माचा या मी जन्म घालतो

मस्त होऊनी प्रेमा मी शोधाया गेलो
लफ़द्यांमधूनी आता मी मग मला शोधतो

खरे सांग तू तेव्हा का तुज नव्हते ठाऊक ?
निराश होतो थोडासा मी हताश नव्हतो

शिव्या घालतो मनात मी कवितेला इतक्या
शिव्यातूनही पुन्हा नवा मी कविच होतो

शिळे खाण्यातच आईची या हयात गेली
बाप बिचारा केस पांढरे काळे करतो

अशी लागते मधेच या दुःखाला उचकी
शमण्यासाठी मी मग त्याला अश्रू देतो

लंगडत लंगडत आलो आहे आता इथवर
इथवर म्हंजे कोठे? हे ना कधी जाणतो

:कमलेश


भरारी

भरारी घ्यायचीच असेल पंखांनी
तर खुशाल घ्यावी आकाशभर
पंख कापले जाण्याचे भय बाळगू नये
भय़ाला शापच असतो कोसण्याचा.
एरव्ही आपल्यापुरतं आकाश
कुठेही बांधता येतं.
म्हणुनच भरारी घ्यावी खुशाल पंखांनी
आणि बांधत रहावं आकाश
जमेल तेवढं ....
जखम पंखांना होते आकाशाला नाही।


: कमलेश

का हो ??

मला नको नको झालं की
देवाची खुप आस लागते.
मग मला आत्महत्या कराविशी किंवा
समाधी घ्याविशी वाटते


इतक्या वर्षात देवाला
आत्महत्या कराविशी वाटली असेल का हो ??


: कमलेश

Monday, May 17, 2010

माझं शहर

अर्धा अर्धा श्वास घेत जगतं माझं शहर
जगता जगता रोज इथे मरतं माझं शहर


ओळखीच्या लोकांनां ठेऊन थोडं दूरं
अनोळख्याशी जरा जास्त बोलतं माझं शहर


डोळ्यांतून जेव्हा कुणी लावतं इथे जीव
स्वप्नांच्या सावल्यात न्हातं माझं शहर


हळू हळू होऊ लागतं जगणं जेव्हा खरं
माय बापाशीच खोटं वागतं माझं शहर


भिका-याच्या हातावर ठेऊन एकदा भीक
भरल्यापोटी पुन्हा मग खातं माझं शहर


मागायला येऊ नका इथे प्रेम माया
आज रोख आणि उद्या उधार माझं शहर


म्हणायला इथे काही पीढीजात नाही
वेळेला मग बरोब्बर वागतं माझं शहर


पॉझिटीव्ह बिझिटीव्ह नसेना का काही
अँटिट्यूड मात्र पॉझिटीव्ह ठेवतं माझं शहर



कमलेश

आटपाट नगर

हे आटपाट नगर हे आटपाट नगर
या आटपाट नगराची गोष्ट लै जबर
तळवे असे हळवे नि मन तस निब्बर
जगाकडं पाहताना कनवाळू नजर ॥ ध्रु ॥


नको तिथे सैल पोरी नको तिथे तंग
बघताना म्हातारे बी होऊ राहीले दंग
काय घालाव काय नाय ज्याचं त्याचं डोकं
कंट्रोल ठेवताना होती काळ्जामधे भोकं ॥ १ ॥


या आटपाट नगरात जागोजाग हॉटेल
खाताखाता बघ तुझं पोटच फ़ुटेल
खाण्याआधी गोळ्या नि खाल्यानंतर काढे
दिनरात ध्यानामधे औषधांचे पाढे ॥ २ ॥


शाळेत जातात पोरं एबीसीडी शिकतात
फ़ि भरतात नेटाने डिग्र्या रोज पिकतात
पोटासाठी पोर मग दूरदेशी जातं
सुख-दु:खामधे ते पैसे पठवून देतं ॥ ३ ॥


: कमलेश

खस्ता


एक चिमुकली इवली इवली
बघता वयात आली
पानांमधूनी थरारणारी
जणू कळी ती दवारलेली

काल कालची अल्लड पोर
आज कुठोनी आले भान
भान तिचे ते पाहून बाकी
भवतालीचे पिकले पान

रोज कशी मग कुणास ठाऊक
मुठीत घेऊन येते तारा
घट्ट ऊराशी सलगी करूनी
ता-याला देते एक निवारा

आभाळाला म्हणते अंगण अन
पाण्याला म्हणते रस्ता
तुझ्यासमोरी पडून बाई
आयुष्याच्या नसत्या खस्ता
कमलेश

Sunday, May 16, 2010

खोल

मला लागायचं सगळंच कडक- स्ट्रोँग
इस्त्री , चहा, दारू, सिगरेट्स,,
त्या तुलनेत अँटँक
मात्र अगदीच माईल्ड आला मला

ती गेली तेव्हा गेली गुंफ़ून
माझ्या श्वासात तिच्या श्वासांची हळूवार वीण
पण तिच्या श्वासांनी केलेली जखम
तुलनेनं फ़ार खोल झाली मला.


.

:कमलेश

विहीर


थांबा...
....
शांत व्हा...
डोळे मिटा...
स्वत:कडे पहा...
...
तुमच्या आतमधे
तुमच्या कल्पनेपेक्शा खोल अशी विहीर आहे....
तिचा तळ शोधा...
अंधार आहे पण आपलाच आहे.
होइल ओळखीचा...
...
चला खोल चला...
...
या अजून खोल या.
...
...
अजून खुप खोल...
अजून तर अंधार दिसतोय डोळ्यांना
....
या अजून या ...
....
हां आता कसं ?
जा अजून खोल जा...
...
घाबरू नका
काय झालं ?
का थांबलात?
...
ती दिसतेय?
हसतेय?
तिला एक स्माईल द्या...
एक किस द्या...
दिलात?
ओके फ़ाईन.
आता पुन्हा खोल जा...
गुड !
वाह... काय सुंदर अंधार आहे न?
फ़ील करा...
आहाहा...
असेच झेपावत रहा
अंधाराच्या दिशेने....
...
जात रहा... जात रहा...
जात ............... रहा...
जा ......त ...र .....हा...
जा .................... त ...
जा...........
.........
.....
...
.
थांबा..... थांबा
अहो शुक शुक
थांबा.
अहो मी येतोच आहे...
मला तुमच्याशी थोडं बोलायचय.
नव्हे... तुम्ही बोला.
मी तुंम्हाला ऎकायला आतूर झालोय.
थांबा प्लिज .

येस .... गेले...

" हेलो देवा, आत्ता जो आला
तो आपला कस्टमर आहे.
कमीशन अकाऊंट्ला ट्रान्सफ़र करा.
मागचं पण थोडं पेंडींग आहे।"
कमलेश

वैताग

उपाशी पोट घेउन आलो इथे
आता वाढलेल्या चरबीचा प्रश्न
जीवघेणा बनलाय...


वन बीएचके , टू बीएचके च्या स्वप्नात
जिंदगी नॅनो बनत चाललीय...


माँड्यूलर किचन, इटालीयन फ़र्निचर ,
लेटेस्ट इलेक्ट्रोनिक्स गुड्सच्या मोहात
स्वत:ची लक्तरं झाली आहेत...


हाय लिव्हिंग एक्सपोला भेटी देत
करीत चाललो आहोत स्वत:च्याच विकृतींचे प्रदर्शन...


कधे मधे सत्य सापडल्य़ासारखं होतं आणि
सगळं मिथ्था वाटायला लागतं
पण साला असल्या युनिव्हर्सल टृथच्या नादानं
एकाकीच पडायला होतं वाईट...


दारूत जीव रमतो खरा
पण विसरायला होत नाही काहीच


आता ना गाव आपला उरलाय
ना शहर आपलं वाटतय।


चरबी कितीही वाढली वरवर
तरी भूक कमी होत नाहीये आतली।


च्यायला झक मारली
अन शहरं पह्यली
झोप गेली कायमची...


कमलेश

Friday, May 14, 2010

काळजाच्या फ़ुला

जीव जिवात गं असा का गुंतला
मी शोधतोय कासावीस तुला
कुठे दिसशील काळजाच्या फ़ुला ॥ ध्रु ॥


चिंब भिजलाय पापण्यांचा झुला
नाही आवराया कुणी या वादळा
कुठे दिसशील काळजाच्या फ़ुला ॥ ध्रु ॥

कसे नशिबाचे पडले हे फ़ासे
प्रेम लाभले ना कुणास जरासे
डाव जीवघेणा साराच हा भासे
डाव मांडूयाना पुन्हा गं आपला
कुठे दिसशील काळजाच्या फ़ुला ॥ १ ॥


होतो वा-यापरी बेभान अफाट
अशी चालताना चुकतो का वाट
कंठ अचानक होतो कसा दाट
तुझ्या वाटेवर श्वास ह थांबला
कुठे दिसशील काळजाच्या फ़ुला ॥ २ ॥

ऋतू येतो तसा जातो गं निघून
सडा प्रेमाचा तो जातो गं शिंपून
घडा आठवांचा ठेवतो जपून
छंद जपण्याचा लागला गं मला

कुठे दिसशील काळजाच्या फ़ुला ॥ ३ ॥

दिस तसे आता कितीक सरले
काटे वाटेतं या तसेच राहीले
काटे पायात गं माझे मी परले
उभा रस्ता हा माझ्यासाठी खुला

कुठे दिसशील काळजाच्या फ़ुला ॥ ४ ॥

कमलेश

Tuesday, May 11, 2010

अजगर

तिच्या मनाच्या

पहिल्या खोलीत:
एक तरंगणारं स्वप्न छोटसं पण पूर्ण

दुस-या खोलीत :
कोंडी ... धगधगती, अस्फ़ूट, अपरीहर्य ...

तिस-या खोलीत :
सनातन भय ।निपचित पडून राहिलेल्या अजगरासारखं जागं

मी आशेनं वावरायचो तिच्या तिन्ही खोल्यात
काळावर हात ठेवायचो ... म्हणायचो...
प्रश्न सुटतील विश्वास ठेव आपल्यावर

एक दिवस तिच्या तिस-या खोलीतला अजगर
पहिल्या खोलीतल्या स्वप्नाला गिळून बसला
त्या दिवसापासनं
तिची सगळी दारं सगळ्या खोल्या
माझ्यासाठी बंद झाल्या...

पण आता तो अजगर काय गिळत असेल हो???


कमलेश

Sunday, May 09, 2010

तीच लग्न ठरल्याचे कळले तेव्हा ...

तीच लग्न ठरल्याचे कळले तेव्हा .....

झाला होता मोठ्ठा भूकंप
माझ्या छातीत ...
जमीन दुभंगली आणि कोसळत गेलं
आम्ही बांधलेल एक एक स्वप्न

भीती वाटली थांबायची आणि
सैरावैरा पलायाची देखिल ...
तरीसुद्धा धावलोच भान हरखून
तिच्या छिन्न विछिन्न आठवणीतुन ...

तीच लग्न ठरल्याचे कळले तेव्हा .....

डोळे पाण्यात होते काही दिवस
श्वास लटकत होते अधांतरी
मी फ़कत गेलो स्वत:ला नसत्या गोष्टीत
उभारी धरण्यासाठी ...
पण कळ यायचीच ...
मग माझ्या मलाच करीत राहिलो यातना
दाह कमी करण्यासाठी ...

तीच लग्न ठरल्याचे कळले तेव्हा .....

मी हाय खाऊन केली तुलना तिच्या
भावी नवर्र्याशी
सेटल असेल , पैसेवाला, कारवाला, हुशार इत्यादि ...
तरीसुद्धा जीव कासाविस व्हायचा तो झालाच
मग मी
मोबाईल , चश्मा , बैगचा चक्काचूर केला
पत्र , कविता , आठवनिंचा धुर केला

तीच लग्न ठरल्याचे कळले तेव्हा .....

मी देवा पुढे जोडले हात
म्हंटले " देवा स्वर्गामधे नको बांधुस लग्नाची गाठ
हौस असेल तशी तर दुःखही तूच भोग
कुणालाच लाऊ नकोस प्रेमाबिमाचा रोग "
जाता जाता शेवटी मी म्हंटले देवाला
"मला राहू देत दू:खी पण सुखी ठेव तिला "

तीच लग्न ठरल्याचे कळले तेव्हा .....

: कमलेश

दुवा

आज हे कोणीच नाही उरले तसे बोलायला
दूर ती गेली आता हवे मना सांगायला

ती फुलांची रास घेउन डोळ्यात या गुन्फायाची
लागले ते गंध सारे डोळ्यातुनी सांडायाला

ठेउनी गेली बरी ती जखम ही ताजी अशी
फार अवघड जन्म हां कोरडा काढायला

चुंबिले होते तिचे मी ओठ केवळ कोवले
आज माझे श्वास मजला लागती रांधायाला

ती तिची राहो सुखी येवढी करतो दुवा
मी निघालो घर माझे ध्रुवावारी बांधायला

कमलेश

Saturday, May 01, 2010

रितं आकाश

ती सहज सामाउन घेते
तिच्या काळ्याभोर बुबुलात
माझ्या अस्तित्वाच
रितं आकाश

मी मोहात पडतो
तिच्या मऊ सफरचंदी गालांच्या
मला टेकवायचे असतात माझे
रखरखीत ओठ तिच्या गालांवर

ती तिचा हात माझ्या हातात
घट्ट रोवते पण
गाल दूर ठेवते माझ्या ओठांपासून ...

तिच्या काळ्याभोर बुबुलात
मला दिसत असतं
माझ्या अस्तित्वाचं रितं आकाश



:कमलेश

हळद






हळद लावली जाईल
जेंव्हा अंगावरती तुझ्या
अश्रु येतील घरंगाळोनी
जखमेवरती माझ्या
अधिकच अल्लड सलज्ज होउन
काढशील तू मेहेंदी
आणि इथे मी असेल बसलो
हरवून माझी धुंदी
मला न ठाउक तेंव्हा तुजला
आठवेन मी किती
परी इथे गं माळ तोड़तील
डोळ्यांमधले मोती

तुला वाटले असेल आता
भेटलोच का आपण ?
जे जे झाले ते ते सारे
कशास केले आपण ?

माझ्यासाठी तुझी आठवण
जन्मभराचा असेल खेळ
तूच सांगना मरेस्तोवरी
पुरेल का गं मजला वेळ ?

: कमलेश

Thursday, April 29, 2010

छत्री

......
छत्री इतकाच पाउस पडायचा
आम्ही भेटलो की ...


मी मुद्दामहून आणायचो छत्री
अन तीही विसरायची रेनकोट..

पाउस सुरु झाला की आपोआप
वलायची पाउले संथ रस्त्यांवर ...
...
इतक्या पावसातही ऐकु यायचा
फ़क्त तिच्या श्वासांचा आवाज
पावसापेक्षा ताज करून टाकायचा
तिचा मंद परफ्यूम

याच छत्री खालून आम्ही केला होता
एकमेकांचे कुणी नसताना पासून
एकमेकांचे सर्वस्व होई पर्यंतचा प्रवास...
...
सुरु झालं तेंव्हा अगदीच अल्लड होतो आम्ही
आणि थांबलो तेंव्हा खुपच मॅच्यूअर्ड

आता खुप उन्हाले उलटून गेलेत
या छत्री वरून ...

नविन होती तेंव्हा खुपच
अल्लड वाटायची छत्री
आणि आता खुपच मॅच्यूअर्ड...


: कमलेश

Sunday, April 25, 2010

ठोके


ठोके चालूच राहणार
चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी वर्षे इत्यादी...

स्वतःच्या
जमा खर्चांचा हिशेब
कोण विचारणार आहे आपल्याला?
कुणीच नाही

तरीसुद्धा चालूच असतो हिशेब
काहीतरी मिळविण्याचा....
काहीतरी बाजूला सारण्याचा...
पुढे जाण्याचा...
इत्यादी ...

जन्माचे सार्थक करण्याच्या हेतूने

अन मग
किती सहज
वाटुन जात
आपल्याला वेळोवेळी
की आपलं म्हणून या जगात कुणीच नसत
हां आपला – परक्यांचा खेळही
एक हिशेबच की...

तात्विक - अध्यात्मिक पुस्तकातून
शेवटी काय मिलवल
आपण ?
पॉलिश अहंकार, मोह, वासना इत्यादी...
पण हिशेब संपलेच नाहीत
डोक्यातले

म्हातारी माणसं पहाताना
आपण
दाखवतो उपरी दया
पण डोक्यात घालून ठेवतो
एक हिशेब
स्वतःच्या म्हातारपणाचा
इत्यादी ...


वरवर पाहता
अमका विसाव्या वर्षी मेला “अरेरे”
तमका ऐंशी गाठून “सुटला”
अशा हिशेबनेच
नोंदवत असतो आपली मतं

पण खरच
हे जगणं
ज्यांनी ज्यांनी म्हणून
केलेल आहे
खुप सुन्दर सुबक, आणि
आपल्यासाठी बहाल
ते साराच
किती बेहिशेबी आहे

हेही ठाउक असत आपल्याला
ठोके चालू असतात तोवर
चाळीस, पन्नास, साठ, सत्तर, ऐंशी वर्षे इत्यादी...

- कमलेश

याही वाचा

Related Posts Plugin for WordPress, Blogger...